Top Newsराजकारण

राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा !

लखनौ : अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट द्वारा खरेदी केलेल्या जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अयोध्येतील माजी आमदार आणि सपा सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंदिर जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.

याबाबत पवन पांडे पत्रकार परिषदेत म्हणाले की, २ कोटीमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला त्याच दिवशी साडे १८ कोटी एग्रीमेंट झाले. या व्यवहारात ट्रस्टी अनिल मिश्रा आणि महापौर ऋषिकेश उपाध्याय साक्षीदार आहेत. १८ मार्च २०२१ रोजी १० मिनिटापूर्वी जी जमीन २ कोटीत खरेदी केली त्याच जमिनीवर करार करण्यात आला. जी जमीन २ कोटी खरेदी केली त्याच जमिनीवर १० मिनिटांत साडे १८ कोटींचा करार कसा झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच १० मिनिटांत असं काय झालं की २ कोटींची जमीन साडे १८ कोटींची झाली? राम मंदिराच्या नावाखाली जमीन खरेदी करण्याच्या बहाण्यानं रामभक्तांची फसवणूक केली जात आहे. जमीन खरेदीचा सगळा व्यवहार महापौर आणि ट्रस्टी यांना माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी माजी मंत्री पवन पांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

दरम्यान, १७ कोटी आरटीजीएस करण्यात आले. कोणकोणत्या खात्यात ही रक्कम गेली त्याची चौकशी व्हायला हवी. प्रभू श्री रामाच्या नावानं जमीन खरेदी करून त्यात भ्रष्ट्राचार केला जात आहे. १.२०८ हेक्टर जमीन खरेदी आणि करार बाबा हरिदास यांनी सुल्तान अंसारी आणि रवी मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर ही जमीन ट्रस्टनं खरेदी केली. १० मिनिटांत जमिनीची किंमत १६ कोटींनी वाढली असं पवन पांडे म्हणाले.

आम आदमी पक्षाचाही आरोप

आम आदमी पक्षानेही या प्रकरणात आरोप केले आहेत. पक्षानं सांगितले आहे की, २ कोटींना खरेदी केलेल्या जमिनीचा करार राम जन्मभूमी ट्रस्टने साडे १८ कोटीने केला आहे. ट्रस्टनं रजिस्टर्ज एग्रीमेंट करून १६.५ कोटी रुपये देऊनही टाकलेत. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, २ कोटींची खरेदी आणि साडे १८ कोटींचा करार या दोन्ही व्यवहारांमध्ये राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा हे साक्षीदार आहेत. याचप्रकारे हेराफेरी करून दान केलेल्या पैशातून १६ कोटी हडपले गेले. हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे. तात्काळ याची सीबीआय आणि ईडी चौकशी व्हावी अशी मागणी आपनं केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button