Top Newsअर्थ-उद्योगराजकारण

डीनो मोरिया, अहमद पटेलांच्या जावयाची कोट्यवधीची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

गांधीनगर : गुजरातच्या संदेसरा ग्रुपमधील मनीलाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली. आठ स्थावर मालमत्ता, तीन गाड्या, अनेक बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड अशा ८.७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्ती आणली. जप्त करण्यात आलेली मालमत्ता संजय खान (३ कोटी रुपये), दिनो मोरिया (१.४० कोटी रुपये), अकिल अब्दुलखलिल बच्चूअली (१.९८ कोटी रुपये) आणि इरफान अहमद सिद्दीकी (२.४१ कोटी रुपये) यांच्या आहेत. यापैकी दिनो मोरिया हे हिंदी चित्रपटातील अभिनेते असून इरफान अहमद सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत.

पीएमएलए कायद्याअंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. १६ हजार कोटी रूपयांचे विविध सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवल्याचा आरोप गुजरातमधील संदेसरा ग्रुपवर आहे. संदेसरा ग्रुपचे नितिन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी कर्ज घेऊन खरेदी केलेली बेहिशोबी मालमत्ता आपल्यासह दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांच्यात वाटून घेतली होती. याप्रकरणात संजय खान, दिनो मोरिया, अकिल बच्चू अली आणि इरफान सिद्दीकी यांच्या मालमत्तेवर जप्ती आणत ईडीने आतापर्यंत याप्रकरणी स्थावर आणि जंगम अशा एकूण १४ हजार ५३१.८० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्त आणली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांना गंडा घातल्याबद्दल सीबीआयने या चारजणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यामुळे पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने तपास करून या चारजणांची मालमत्ता जप्त केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच ईडीने चारजणांना अटकही केली आहे. त्यात नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, दीप्ती चेतन संदेसरा आणि हितेश पटेल यांचा समावेश आहे. पुढील तपास ईडी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button