नाशिक : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी हिनासह २२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हिनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली.
वाढदिवसानिमित्त मित्रांना घेऊन इगतपुरी गाठली. केक कापल्यानंतर पार्टीत सारेच जण अंमली पदार्थांच्या नशेत तल्लीन झाले. इतक्यात पोलिसांची धाड पडली आणि पार्टी उधळून लावली. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. या पार्टीची चाहूल पोलिसांना लागली. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली.
पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले १० पुरुष आणि १२ महिला अशा एकूण २२ जणांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं आहे. अटक झालेल्या व्यक्तींमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली डान्सर हिना पांचाळ ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. हिना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. हिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट करतानाचे केलेले व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध आहेत. हिनाचे अनेक टीकटॉक व्हिडीओही व्हायरल झाले होते.
मुंबईतून एकाला अटक
या छाप्यात मिळालेले अंमली पदार्थ नेमके कुठून आणले याबाबतची माहिती घेऊन एक तपास पथक तात्काळ मुंबईला रवाना झालं. मुंबईत या पथकाने एका नायजेरियन नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत