आरोग्य

घरात विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा मोठा प्रसार!

मुंबई : राज्यातच नाही तर देशात सध्या दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वेगाने वाढत आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचा एक फॅक्टर समोर आलाय तो म्हणजे ‘होम आयसोलेट’ असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात रुग्ण यायला नको. असे असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरत आहेत. घरात विलगीकरणात राहिलेल्या रुग्णांकडूनच कोरोनाचा मोठा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मागच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरु झाला यात पहिल्यांदा रुग्ण आढळल्यानंतर थेट रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढली आणि यात लक्षण असलेले आणि लक्षण नसलेले अशी वर्गवारी करण्यात आली. त्यातही रुग्णालय फुल्ल झाल्यानंतर होम आयसोलेशनचा पर्याय समोर आला. मात्र यासाठी अनेक नियम घालून देण्यात आले होते. परंतु या नियमांचे दुसऱ्या टप्प्यात मात्र पालन होत नाही. त्यामुळे वसाहतीत आणि सार्वजनिक ठिकाणी वावरणारे होम आयसोलेटेड रुग्ण ओळखणे अवघड झाले असून त्यांच्या माध्यमातुनच कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे.

कोरोना झाल्यानंतर 14 दिवसांपर्यंत होम आयसोलेशन दिले जाते. मात्र कमी लक्षणे असल्याने या रुग्णांना 5 ते 7 दिवसांतच बरे वाटायला लागते, परंतु तरीही रुग्णांनी 14 दिवस कोणाच्याही संपर्कात येण्याचे टाळले पाहिजे. मात्र मला आता लक्षणे नाहीत, काहीच त्रास नाही. दमही लागत नाही आणि माझे ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असल्याचे कारणे देत मी बरा झाल्याचा आत्मविश्वास या रुग्णांमध्ये येतो. मग हे रुग्ण 5 ते 7 दिवसातच घराबाहेर पडत आहेत आणि तेच कोरोनाच्या सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. त्यातच मागील काही दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलांना लक्षणे तर दिसत नाहीत परंतु ते पॉसिटिव्ह आढळतात. विशेष म्हणजे घरातील एखादी व्यक्ती बाधित झाल्यानंतर मुलांची तपासणी केल्यास ही बाब समोर येते. या मुलांच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होम आयसोलेटेड रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. उपचार सुरु असताना मला काहीच दुखणं नाही असे म्हणत हेच रुग्ण अनेक वेळा बाहेर पडून बाजारात विविध वस्तूंची खरेदी करत आहेत. त्यात मग किराणा, भाजी, फळ असो आणि इतर बाबी. रोज बाजारात शासनाने निर्धारित केलेल्या वेळेच्या आधी मोठी गर्दी होत आहे आणि तिथूनच हा संसर्ग अनेक जण आपल्या घरापर्यंत घेऊन जात आहेत. यावर प्रशासनाने किमान या रुग्णांना होम आयसोलेट असल्याचा शिक्का हातावर मारणे अथवा इतर पर्याय शोधून या रुग्णांचे बाहेर पडणे थांबवणे आज गरजेचे बनले आहे.

एकूणच होम आयसोलेशनमधील बेफिकीर रुग्णच कोरोनाच्या फैलावासाठी घातक ठरत आहेत. त्यामुळे या रुग्णांपासून वाढणारा संसर्ग वेळीच रोखायला हवा ज्यासाठी प्रत्येक रुग्णाने आपली मानसिकता बदलून माझ्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी प्रशासनानेही कडक पाऊल उचलली पाहिजेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button