सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई, निर्मला सीतारामन यांची माहिती
नवी दिल्ली : एबीजी शिपयार्ड लि. फसवणूक प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एबीजी शिपयार्ड फसवणूक प्रकरणी एनडीए सरकारकडून कमीत कमी वेळेत मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
केंद्रातील एनडीए सरकारने एबीजी शिपयार्ड फसवणूक प्रकरण फार कमी वेळात शोधून काढून त्यावर कारवाई करण्यात आली. तसेच शिपयार्डचे खाते नोव्हेंबर २०१३ मध्येच नॉन परफॉर्मिंग अकाऊंट म्हणून घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी कारवाई सुरू केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. एबीजी शिपयार्ड मुद्यावरून विरोधक सतत सरकारला घेरण्यात व्यस्त आहे. २०१४ मध्ये आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एबीजी शिपयार्डचे कर्ज खाते एनपीए झाले होते. हा मुद्दा उपस्थित करून विरोधक पायावर कुऱ्हाड चालवत असल्याचे सीतारमण यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून एबीजी शिपयार्ड फ्रॉडवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटींचा बँक फ्रॉड करण्यात आलेत. ७५ वर्षांत भारतातील जनतेच्या पैशांशी कधीही अशी फसवणूक झालेली नाही. कारण लूटमारीसाठी हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठी चांगले आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय.
बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. एबीजी शिपयार्ड या कंपनीने देशातील आघाडीच्या २८ बँकांची जवळपास २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील पुरावे हाती येताच सीबीआयने कारवाईला सुरूवात केली आहे. एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ दरम्यानचा हा घोटाळा आहे.