राजकारण

भाजपच्या प्रति विधानसभेला भास्कर जाधवांचा आक्षेप; कारवाईची मागणी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याचा देखील अधिकार आहे. परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचे आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात? त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर आपलं म्हणणं मांडण्यासाठी भास्कर जाधव उभे राहिले. यावेळी त्यांनी तीन मुद्दे मांडले. संसदीय कार्यमंत्र्यांना बोलावून पायऱ्यांवर गदारोळ करणाऱ्यांना भाजप सदस्यांना विधानसभेत बोलवा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच बेकायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या भाजप आमदारांचा स्पीकर जप्त करा, प्रतिविधानसभेसाठी अध्यक्षांची परवानगी घेतली का ते पाहा, नसेल तर संबंधितांवर कारवाई करा, असं ते म्हणाले. तसंच कोरोनामुळे शासनाने अधिवेशनावेळी इतके कडक निर्बंध लावलेले असताना माजी आमदार भाजपच्या प्रति विधानसभेत कसे, असे सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button