शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानाईत-धिवरे

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बानाईत याआधी रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कान्हूराज बगाटे यांची १० ऑगस्ट २०२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली होती. त्यांना सरकारने पदोन्नतीतून आएएस पद दिलं. ते थेट आयएएस अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. कान्हूराज बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानाईत यांची नेमणूक करण्यात आली आहे, बगाटे मात्र अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
भाग्यश्री बानाईत यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. मोर्शी येथील कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी पदवी घेतली. आई-वडील दोघंही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सीनंतर त्या बीएड झाल्या. त्यानंतर एक वर्ष त्यांनी एमएससी केलं. एमपीएससी परीक्षेत सलग निवड होत २००५ मध्ये प्रकल्प अधिकारी, २००६ मध्ये तहसीलदार, तर २००७ मध्ये विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पद त्यांना मिळाले. पण या निवडींवर समाधान मानलं नाही. अखेर २०१२ मध्ये त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. त्यावर्षी निवड झालेल्या भाग्यश्री बानाईत-धिवरे या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या होत्या.