नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी खा. भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत असून भाजपचेही आव्हान या दोन्ही पक्षांनी असणार आहे. तसेच, तेथील प्रादेशिक पक्षांनाही आम आदमीला तोंड द्यावे लागणार आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलन, व यावेळी राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका या निवडणुकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे नेते असून सध्या पंजाबमधील संग्रुर लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले आहेत. त्यामुळे, केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणा करत आपला पत्ता ओपन केला आहे. आता, भाजप आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणता उमेदवार घोषित होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असतानाच आम आदमी पार्टीने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार थेट जनतेमधूनच ठरवण्याचा निर्णय आपने घेतला होता. त्यानुसार आम आदमी पार्टीने फोन आणि व्हॉट्सअॅपवरून लोकांची मते मागवली होती. एकूण २१ लाख ५९ हजार ४३७ लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं. त्यात टेलिव्होटमध्ये भगवंत मान यांच्या नावाला सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शवली होती. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज मोहालीत पत्रकार परिषद घेऊन भगवंत मान हे मुख्यमंत्रीपदाचे आपचे उमेदवार असतील असं जाहीर केलं.
केजरीवाल आणि सिद्धूंनाही पसंती
या व्होटिंगमध्ये २१ लाख ५९ हजार ४३७ लोकांनी कौल दिला होता. यातील काही लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावालाही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. मात्र, ९३ टक्के लोकांनी भगवंत मान यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून कौल दिला. तर ३.६ टक्के लोकांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. राज्यातील जनतेला टेलिव्होटिंगचाही पर्याय दिला होता. मात्र, त्यात मुख्यमंत्रीपदाच्या नावाचं ऑप्शन देण्यात आलं नव्हतं. एखाद्याला आपली पसंती कळवायची असेल तर त्यांना फोन करून बीपनंतर त्यांच्या पसंतीचं नाव एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप करून कळवावं लागत होतं. अशा पद्धतीने मिळालेल्या व्होटिंगवरून सीएमपदाच्या चेहऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचाच विजय होईल असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. चंदीगड महापालिकेत विजय मिळाल्यानंतर आपचा आत्मविश्वास वाढला आहे. भगवंत मान हे ४८ वर्षीय आहेत. ते दोन वेळा खासदार राहिले आहेत. सध्या पंजाबचे आपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंजाब निवडणुकीसाठी आपने ‘जनता चुनेगी अपना सीएम’ ही मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार त्यांनी जनतेचा कौल मागवला होता. व्होटिंगद्वारे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवणारा आम आदमी पार्टी हा राज्यातील एकमेव पक्ष आहे.
देशभरात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाच राज्यांपैकी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाब आणि गोवा या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आपची जादू पहायला मिळाली आहे. त्यामुळे, येथे आम आदमी पक्षाचे प्रभुत्वही दिसून येते.