मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आमच्या चिन्हांवर निवडून आला होतात, असं म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे. फडणवीसांच्या या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांनी छगन भुजबळांसह निवडून आलेल्या शिवसेनेच्या वाघांची यादीच वाचली. भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवक निवडून आले होते, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाचं प्रत्युत्तर दिलं. भाजपच्या जन्मतारखेचा दाखला जर त्यांनी आणला तर उत्तर देणं सोपं होईल. लोकांना कळेल भाजप कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला. भाजपचा जन्म १९८० च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. शिवसेनेचा जन्म १९६९ सालचा. शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद गुप्ते कधी झाले, त्यावेळी आमच्याकडे किती नगरसेवक होते या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेवू आणि जर कोणाला त्याचा अस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक हे त्याच काळात निवडून आले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गिरगावात प्रमोद नवलकर आमचे आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावातून आमचे छगन भुजबळ निवडून आले होते. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत अनेकदा, असा टोला लगावतानाच देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी संबंध नसेल महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनाच्या मुद्द्यावरूनही भाजपवर हल्ला केला. कोणी काही म्हटलं तरी इतिहास, दस्ताऐवज रेकॉर्ड्स आहेत. सीबीआय स्पेशल कोर्ट निर्माण झालं त्यासमोरचे साक्षीपुरावे आहेत, बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना आरोपी केलं होतं. आडवाणींबरोबर ठाकरे त्यातील एक आरोपी आहेत. मग कोर्ट मूर्ख होते का? शेकडो कारसेवक मुंबईतून गेले तेव्हा त्यांना कोणताही राजकीय पक्ष नव्हता. अगदी विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे, चंद्रकांत खैरे, सतीश प्रधान अनेक लोक आमचे इथून गेले होते. त्या काळातील ‘सामना’ पाहिला तर कोण कोण कुठून निघाले त्याची मॉनिटरींग मुंबईतून होत होती. सेना भवनात त्या काळात वॉर रूम तयार झाली होती, असंही ते म्हणाले.
तेव्हा आता कुणाला आता वेगळी माहिती द्यायची असेल. कितीही माहिती प्रसवली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. शिवसेनेचं योगदान ऐतिहासिक आहे. हा लढा थंड पडला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो आणि वातावरण तापवलं. सरकारला जाग आली. अयोध्येशी आमचा संबंध काय हे रामाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.