चंपा असो की दंफा, शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेनंतर गप्प का?; अरविंद सावंत यांचा घणाघाती हल्ला
मुंबई : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. कर्नाटकात भाजप सरकार आहे. पण दोषींवर कारवाई झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घ्या, मगच बोला, असं आव्हानच शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला दिलं आहे. दरम्यान, देशाच्या देवाचा अपमान होतो. पण चंपा असो वा दंफा कोणीच बोलत नाही, असा घणाघाती हल्लाही अरविंद सावंत यांनी चढवला आहे.
अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कर्नाटकात भाजप सरकार पण देशाच्या देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा दंफा कोणीच बोलत नाहीत, असा घणाघाती हल्ला चढवतानाच कानडी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्रात राहता. इथे तुम्हाला त्रास होत नाही. शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही तुमच्या सरकारला सांगा अन्यथा महाराष्ट्रत राहणं कठीण होईल, असा इशारा सावंत यांनी दिला.
आम्ही सत्व आणि तत्त्व सोडलं नाही. आम्हाला आमचा मूळ स्वभावावर यायला देऊ नका, असा इशारा देतानाच छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यावर सर्वांचीच बोबडी वळली आहे, असंही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. आधी बोम्मईंचा राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचं दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे घराघरातून पत्रं जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. बोलतील एक आणि करतील दुसरेच असे हे भाजपचे लोक आहेत. केवळ राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव घेतात. मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षावर शाई फेकली. तिच शाई महाराजांवर फेकली. आता ही लोक दरवाजावर येतील. काळजी घ्या, असंही ते म्हणाले.