पाकिस्तानमधील हिंदूंची जी अवस्था आहे,तशीच अवस्था सध्या बांगला देशातील हिंदूंची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बांगला देशच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर येथील हिंदूंवर हल्ले होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीही येथील हिंदूंना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. पण आता त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पाकिस्तानप्रमाणे बांगला देशातही हिंदूंच्या बाबतीत भेदभाव करण्यास सुरुवात झाली आहे.
हिफाजत-ए-इस्लाम,या जहाल संघटनेच्या हजारो जेहाद्यांनी नुकताच एका गावावर हल्ला चढवून ८० घरांची नासधुस केली. त्यानंतर नौगाव या गावावर आक्रमण केले, त्यामुळे भयभीत झालेल्या हिंदू कुटुंबांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाव सोडलं आहे. परंतु या सर्व घटनांचे कुठेही पडसाद उमटले नाहीत. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे जगभरातील देश,आज या घडामोडीवर चकार शब्द काढायला तयार नाहीत. बांगलादेशही आता पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या धर्तीवर कट्टर इस्लामिक राष्ट्र म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील हिंदूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.येथील कट्टरपंथीयांकडून हिंदूंची गावे व मंदिरे उध्वस्त करण्यात येत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बांगला देशातील जहाल संघटनाही आता हिंदूंवर हल्ले करत आहेत.फाळणीनंतर पाकिस्तान कट्टर इस्लामिक राष्ट्र म्हणून उदयाला आले तर १९७१ च्या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तानला
पाकी राज्यकर्त्यांच्या जोखडातून मुक्त करून सोनार बांगला देशाची निर्मिती केली. आज ४० वर्षांनंतर तो देश देखील कट्टर इस्लामिक देश म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात हिंदूंची ४२८ मंदिरे होती. यापैकी आज अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली.हिंदूंची हॉटेल्स,जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यात आली.आता तेच बांगला देशात सुरू झाले आहे.यापूर्वी म्यानमार देशातून रोहिग्यांना पळ काढावा लागला. तेच आता बांगला देशात घडत आहे.
६ डिसें.१९९२ रोजी बाबरी मशीद उध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानात सुमारे १०० मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, तर अनेक मंदिरे ताब्यात घेऊन पाकिस्तानच्या उद्योगपतींनी मंदिराच्या जागांवर आलिशान हॉटेल्स उभारली आहेत. वास्तविक या सर्व प्रकरणी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मागायला हवी होती, पण तत्कालीन सरकारांनी त्याकडे कानाडोळा केला. बांगला देशात सध्या जे काही घडत आहे, त्याविषयी परराष्ट्र खात्याने बांगलादेशच्या राजदुताना बोलावून समज देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात येथील हिंदूंना जगणे मुश्कील होणार आहे.