अबुधाबी : प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं केलेल्या दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातला हा सामना औपचारिकच ठरला. बंगळुरूनं तिसऱ्या स्थानासह एलिमिनेटरमध्ये जागा मिळवली आणि त्यांना कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीचा पराभव झाला असला तरी त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. आता क्वालिफायर १मध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे. श्रीकर भरतनं अखेरच्या चेंडूवर षटकार मारून बंगळुरूला थरारक विजय मिळवून दिला.
पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत ८८ धावा चोपल्या. दिल्लीनं क्वालिफायर १मध्ये आधीच स्थान पक्कं केल्यामुळे आज त्यांचे फलंदाज मनमोकळेपणाने खेळले. पृथ्वीची थंड पडलेली बॅट आज आग ओकताना दिसली. गब्बरही त्याला उत्तम साथ देत होता. ११व्या षटकात पर्पल कॅपचा विजेता हर्षल पटेल यानं बंगळुरूला पहिलं यश मिळवून दिलं. धवन ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात पृथ्वी (४८ धावा) ला चहलनं चालतं केलं. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या धावसंख्येवर लगाम लागली. कर्णधार रिषभ पंत (१०) आज अपयशी ठरला. श्रेयस अय्यनं खेळपट्टीवर टीकण्यासाठी पुरेसा वेळ घेतला, परंतु तो (१८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिमरोन हेटमायरनं २९ धावा करत दिल्लीला ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारून दिली.
विराट कोहली व देवदत्त पडिक्कल बंगळुरूचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर माघारी परतले. देवदत्तला भोपळाही फोडता आला नाही, तर विराट ४ धावा करू शकला आणि या दोघांना अॅनरिच नॉर्ट्जे यानं बाद केले. श्रीकर भरत आणि एबी डिव्हिलियर्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अक्षर पटेलनं ही जोडी तोडताना एबीला २६ धावांवर माघारी परतला. भरतनं ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलनं फॉर्म कायम राखताना भन्नाट फटके मारले. मॅक्सवेल व भरत या जोडीनं १०च्या सरासरीनं धावा कुटल्या. बंगळुरूला अखेरच्या १८ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना १८व्या षटकात त्यांनी १५ धावा केल्या. त्यामुळे सामना १२ चेंडूंत १९ धावा असा झाला. नॉर्ट्जेनं १९व्या षटकात केवळ चार धावा देत सामन्यातील चुरस अधिक वाढवली.
आवेश खाननं टाकलेल्या २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर मॅक्सवेलनं ६ धावा करताना वैयक्तिक अर्धशतकासह भरतसह शतकी भागीदारी पूर्ण केली. आवेशनं तिसरा चेंडू यॉर्कर फेकला अन् मॅक्सवेलसाठी पायचीतचे अपील झाले. दिल्लीनं त्यासाठी डीआरएस घेतला. मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये २००० धावांचा पल्लाही पार केला. भरत स्ट्राईकवर असताना आवेशनं चौथा चेंडू निर्धाव फेकला आणि आता बंगळुरूला २ चेंडूंत ८ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या, त्यात एक वाईड चेंडू फेकला गेला. त्यामुळे १ चेंडू ५ धावा असा सामना आला. अखेरच्या फुलटॉसवर भरतनं षटकार खेचून बंगळुरूला ७ विकेट्सनं विजय मिळवून दिला. भरत ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला, तर मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.