दुबई : ऑस्ट्रेलियानं सुपर १२ मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. वरवर माफक वाटणारे लक्ष्य पेलवताना ऑस्ट्रेलियाचीही दमछाक झाली. गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आफ्रिकेकडूनही जबरदस्त कामगिरी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळेच स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल मैदानावर असेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात असलेला सामना आफ्रिकेनं चुरशीचा बनवला. पण, ऑस्ट्रेलियानं पहिलाच सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला बोलावले. कर्णधार टेम्बा बवुमा ऑसी गोलंदाज मिचल स्टार्कनं टाकलेल्या पहिल्याच षटकात दोन सुरेख चौकार खेचले पण तो ७ चेंडूंत १२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हेझलवूडनं पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( २) यष्टिरक्षक मॅथ्यू वेड करवी झेलबाद केले. क्विंटन एकाबाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याची विकेट विचित्र पद्धतीनं पडली. क्विंटन ७ धावांवर बाद झाला. हेनरिच क्लासेन ( १३) हाही लगेच माघारी परतला. डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी संघर्ष केला, परंतु त्यांची ३४ धावांची भागीदारी अॅडम झम्पानं संपुष्टात आणली. झम्पानं त्याच षटकात ड्वाईन प्रेटोइसला ( १) बाद केले.
झम्पानं चौथं षटक पूर्ण करून २१ धावांत २ विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलनंही २४ धावांत १ विकेट घेतली. मार्कराम चांगला खेळला, परंतु त्याला साजेशी साथ मिळाली नाही. तो ३६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४० धावांवर माघारी परतला. जोश हेझलवडूनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेला शतकी पल्ला पार करण्यासाठी १८व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. आफ्रिकेला ९ बाद ११८ धावाच करता आल्या. मिचेल स्टार्कनं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाची सुरूवातही फार चांगली झाली नाही. कर्णधार अॅरोन फिंच ( 0) भोपळा न फोडताच माघारी परतला. डेव्हिड वॉर्नरही ( १४) पॉवर प्लेच्या आतच बाद झाला. केशव महाराज व तब्रेज शम्सी या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या धावांवर चाप बसवली. त्याच दडपणार मिचेल मार्शनं ( ११) महाराजला विकेट दिली. ३ बाद ३८ अशा कात्रित सापडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मदतीला स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल ही अनुभवी जोडी धावली. मॅक्सवेलला फटकेबाजी करण्यापासून आफ्रिकेनं रोखलं होतं खरं, परंतु ही जोडी डोईजड झाली होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या.
स्मिथचा ( ३५) १५व्या षटकात एडन मार्करामनं अफलातून झेल टिपला. ऑसींना अखेरच्या पाच षटकांत विजयासाठी ३८ धावा हव्या असताना आणखी एक धक्का बसला. शम्शीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल ( १८) त्रिफळाचीत झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्याची ५०वी विकेट ठरली. मॅथ्यू वेडनं १७व्या षटकात ११ धावा काढून ऑस्ट्रेलियावरील दडपण कमी केलं. आता त्यांना १८ चेंडूंत २५ धावा करायच्या होत्या. प्रेटोरीअसनं १८व्या षटकात ७ धावा दिल्या. कागिसो रबाडा ( १-२८), केशव महाराज ( १-२३) व तब्रेझ शम्सी ( १-२२) यांनी उत्तम गोलंदाजी केली.
नॉर्ट्जेनं टाकलेल्या १९व्या षटकात १० धावा आल्या अन् आता ऑसींना ६ चेंडूंत ८ धावा करायच्या होत्या. ३ षटकांत १६ धावा देणारा प्रेटॉरिअस गोलंदाजीला होता, परंतु मार्कस स्टॉयनिसनं पहिल्या दोन चेंडूंत ६ धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर चौकार खेचून स्टॉयनिसनं ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्स राखून विजय पक्का केला. स्टॉयनिस २४ धावांवर, तर मॅथ्यू वेड १५ धावांवर नाबाद राहिले.