![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/11/aussie.jpg)
दुबई : ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरूवारी बांगलादेशवर ६.१ षटकांत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं नेट रन रेटमध्ये सुधारणा करताना ग्रुप १ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठा धक्का बसला होता आणि त्यात दक्षिण आफ्रिकेनं दणदणीत विजय मिळवून सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आजच्या सामन्यात नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठा विजय मिळवणे गरजेचा होता आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी तो मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचा संपूर्ण संघ १५ षटकांत ७३ धावांवर माघारी परतला. अॅडम झम्पानं १९ धावांत ५ विकेट्स घेत ट्वेंटी-२०तील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशची ही दुसरी निचांक खेळी ठरली. यापूर्वी २०१६मध्ये न्यूझीलंडनं त्यांना ७० धावांत गुंडाळले होते. आजच्या सामन्यात मिचेल स्टार्क ( २-२१) व जोश हेझलवूड ( २-८) यांनी प्रत्येकी दोन, तर ग्लेन मॅक्सवेलनं एक विकेट घेतली. बांगलादेशचा मोहम्मद नईम ( १७), शमीम होसैन ( १९) व महमुदुल्लाह ( १६) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली. ऑस्ट्रेलियाला नेट रन रेटमध्ये आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी हा सामना ८ षटकांत जिंकणे गरजेचे होते.
अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी त्या दृष्टीनं खेळ केला. फिंचनं २० चेंडूंत २ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ४० धावा केल्या. त्यानं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. वॉर्नर १४ चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियानं ६.१ षटकांत २ बाद ७८ धावा करताना ग्रुप १ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हा ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२०तील षटकांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी श्रीलंकेवर १०.२ षटकांत विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे ६ गुण व १.०३१ नेट रन रेट झाला आहे.