चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ‘एटीव्ही’ वाहने दाखल
मुंबई : मुंबई शहरातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज आणि अत्याधुनिक अशी वाहने देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आज ही अत्याधुनिक ‘एटीव्ही’ – ATV (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहने पोलीस दलास प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही दहा वाहने मार्गस्थ करण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने ही वाहने देण्यात आली आहेत. गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या सोहळ्यास पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या शिरीन कोतवाल आदी उपस्थित होते.
या वाहनाला सर्वपृष्ठीय वाहन असे म्हणू शकतो. एखादी अघटीत घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी पोहचण्यासाठी या वाहनाचा वापर करता येतो. त्यासाठी ही वाहने मुंबई पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे एक सर्व समावेशक असे वाहन आहे. ते जमीन, रेती, दलदलीचा भाग, वालुकामय अशा सर्व पृष्ठभागावर चालते. त्यामुळे चौपाटी परिसरात याचा वापर करता येऊ शकतो. वाहनाची ५७० सीसी अशी उच्च क्षमता आहे. त्यामुळे ही वाहनं वेगवानही आहेत. बंदोबस्तावरील चार जण या वाहनातून गस्त घालू शकतात. आणीबाणीच्या प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हूक्स अशा सुविधांचाही वापर करता येऊ शकतो.