मुंबई : जिल्हा प्रशासनाचे कामकाज म्हणजे तलवारीच्या धारेवरची कसरतच म्हणावी लागेल. त्यातही महसूल विभागातील कामकाज अधिक दक्षतेने पार पडणे तसे जिकीरीचेच. नाशिक जिल्हा महसूल विभागात गत काही दिवसांपासून अतिरिक्त कामांचा निपटारा करुन, लाभार्थींना न्याय देताना अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडताना अनुभवायला मिळत आहे. मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सर्वच सक्षम अधिकाऱ्यांच्या चोख नियोजनामुळे नाशिक प्रशासन अधिक कार्यक्षमतेने आपले कामकाज करीत आहे.
नाशिक जिल्हा महसूल विभागात गत काही दिवसांपासून अस्वस्थता आढळून आली होती. याविषयाच्या अनेक बातम्याही विविध मार्गाने प्रसिद्धीस आल्या होत्या, सनदी अधिकारी, वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी महसूल, जिल्हा प्रशासनातील विविध कार्यालयांतील विस्कळीत झालेल्या कामकाजाबाबत अनेक पक्षकारांची नाराजी असल्याचे वृत्तही झळकले होते. ‘डीजी२४’च्या स्थानिक प्रतिनिधींनी या सर्वच बाबींचा खोलवर आढावा घेतला असता असे लक्षात येते की, केवळ गैरसमजातून आणि अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या सांगोवांगी माहितीवर आधारीतच गत काही दिवसांत विशिष्ट समाज माध्यमांद्वारे महसूल खात्याविषयीच्या चुकीच्या बातम्यांचा भडीमार करून प्रशासकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोरोना आचारसंहितेच्या काळात अतिरिक्त कामाचा ताण प्रशासनातील सर्वच खात्यात जाणवतो आहे, त्या कामाच्या ताणातूनच एकमेकांविषयी संशयास्पद वातावरण निर्माण झाले असल्याची प्रांजळ कबुलीही काहींनी दिली आहे. कोरोनामुळे सर्वच थरांतील ताण, अडचणी वाढत आहेत. महसूल अथवा जिल्हा प्रशासनातील कामांचा खोळंबाही कोरोनाच्या बदलत्या आचारसंहितेमुळे वाढताच राहिला होता. स्वाभाविकच अनेक खात्यांची कामे एकट्या दुकट्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करावी लागली होती. ज्यांच्याकडे अधिभार दिला होता वा ज्यांनी दिला होता त्यांच्यात कसलीच स्पर्धा किंवा असूया असण्याची कारण नव्हते आणि नाही. दोन आठवड्यापूर्वी प्रशासकीय वार्षिक दफ्तर तपासणीच्या अनुषंगाने काही फाईल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करण्यात आल्या होत्या, मात्र तो प्रशासकीय कामकाजाचा नियमित भाग असल्याचेच अधिकृत सूत्रांकडून निदर्शनास आले आहे. माध्यमांशी बोलताना स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही ते स्पष्ट केले आहे. अशाप्रकारची तपासणी करणे हा संपूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार व जबाबदारी हे सर्वमान्य आहे.
या तपासणीचा कोणत्याच अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा वा कोणत्याही अधिकाऱ्यांना दुखावण्याचा वा कोणाच्याही कामकाजात हस्तक्षेप करण्याचा हेतू नसल्याचेच समोर आले आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये काही असंतोष, धुसफूस असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या किंवा तशा बातम्या पेरण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होत होते. मात्र प्रत्यक्षात अशा पद्धतीचा कोणताच गैरसमज कोणत्याच अधिकारी वर्गामध्ये अथवा कर्मचाऱ्यांमध्ये नसल्याचे निराकरणच समोर येते आहे.
‘डीजी२४’च्या हाती आलेल्या माहितीनुसार नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कोरोना कालावधीमध्येही प्रशासनातील प्रत्येक विभागातील कामाजाला गती देण्याचा आणि त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्यांच्या गतीशील नेतृत्वाला त्यांच्या दुय्यम आणि समांतर सनदी अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेही अनुकूल साथ दिली आहे. कामातील विस्कळीतपणा टाळण्यासाठी काही कठोर निर्णय, खांदेपालट करुन सर्वांना सोबत नेण्याची हातोटी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे आहे म्हणूनच तर कोरोना कालावधीतही नाशिक महसूल आणि जिल्हा प्रशासनातील अनेक प्रलंबित कामांना आकार मिळतो आहे. गत दोन वर्षांपासून नाशिक प्रशासनातील कामकाजात सुसूत्रता आल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला आहे. नजीकच्या दिवसांत नाशिक शहर व जिल्हा फक्त धार्मिक वा पर्यटनाचा केंद्रबिंदू न राहता एक आदर्श महसूल केंद्र, आयटी हब, रोजगारनिर्मितीचे एक सक्षम केंद्र म्हणून उदयास येईल यात शंका नाही.
नाशिक जिल्ह्याची ओळख आता फक्त धार्मिक, पर्यटन अशी मर्यादित न राहता एक प्रभावी महसुली जिल्हा म्हणून उदयास येते आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना संकटानंतर एक आश्वासक वातावरण निर्मिती होते आहे. अनेक उद्योगांनी इथे एन्ट्री केली आहे. स्व. विनायकदादा पाटील यांनी उद्योगमंत्री पदावर असताना नाशिकच्या पर्यटनाला आणि निसर्गंसंपदेला बाधा येणार नाही याची काळजी घेताना जिल्ह्यात केमिकल फॅक्टरीज येणार नाहीत याची तरतूद केली होती. आजवरच्या नाशिकच्या पालकमंत्र्यांनीही ही काळजी घेतली आहे. म्हणूनच तर नुकतेच आयटी हबसाठी केंद्राने नाशिकची निवड केल्यानंतर इथल्या स्थानिकांमध्ये एक समाधानाची वातावरण तयार झाले आहे. येथील तरुणांना रोजगाराच्या संधीसोबतच शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या उपक्रमांचे स्वागत नाशिककरांनी नेहमीच केले आहे. अर्थातच हरित नाशिकसोबतच उद्यमनगरी नाशिक अशी ओळख देण्यासाठी सध्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे निश्चितच आपल्या सहकाऱ्यांसह योगदान देतील यात नाशिककरांना शंका नाही.