चार कोटीचीच संपत्ती जप्त, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार : अनिल देशमुख
मुंबई : मनी लॉर्डिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून ४ कोटी २० लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे आजची किंमत ही ३०० कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुख यांची ४ नाही तर तब्बल ३०० कोटी रुपयाची संपत्ती जप्त केल्याचं बोललं जात आहे. याबाबत स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपली ३०० कोटी नाही तर फक्त ४ कोटीची संपत्ती ईडीने तात्पुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले.
ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे ४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने २००६ मध्ये २ कोटी ६७ लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात २ कोटी ६७ लाख रुपयांची जमीन ३०० कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहेत, असं देशमुख यांनी म्हटलंय. तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
या वयात लपाछपीचा खेळ झेपणार नाही : भातखळकर
ईडीकडून होत असलेल्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई होईल, असा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या अनेक नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक सूचक विधान केले आहे. भातखळकर यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख यांचे आता वय झाले आहे. या वयात त्यांना लपाछपीचा खेळ झेपेल, असे वाटत नाही, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.