सामान्य माणसाचे डोळे उंदराने कुरतडले, तर शिवसेनेने मुंबई महापालिकेलाच कुरतडले : आशिष शेलार
मुंबई : महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवलाय. सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर मुंबई महापालिकेला शिवसेनेनं कुरतरडलं असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी केलीय.
सामान्य माणसाचा जीव शिवसेनेने टांगणीला लावलाय. सायन रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जातात. तर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर रुग्णांचे डोळे करतडत आहेत. ही मुंबई आणि महापालिकेची आजची स्थिती आहे. ८० हजार कोटीचं फिक्स डीपॉझिट, १ हजार २०० कोटीच्या वर आरोग्याचं बजेट, मग या बजेटला कोण कुरतडत आहे? असा प्रश्न विचारतानाच हे पाप शिवसेनेचं असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केलाय.
श्रीनिवास यलप्पा या तरुणाला श्वास घेताना दम लागत होता. नंतर त्रास असह्य झाल्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणाला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले. या बाबतचे उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. नंतर नातेवाईकांनी तपासले असता तरुणाच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचं समजतं.
दरेकरांची पाठराखण
मुंबै बँक कथित घोटाळ्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राजीनामा मागितला जात आहे. याबाबत विचारलं असता दरेकर हे विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करत असल्यामुळे त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. बँक घोटाळ्याच्या कुठल्याही चौकशीला दरेकर आणि मुंबै बँक मागे राहिली नाही. अजूनही चौकशी करावी, त्यात लपवण्यासारखं काही नाही. चौकशी करणार नाही तोवर योग्य निष्कर्षावर तुम्ही येणार नाही. सत्ता तुमच्याकडे आहे, राजीनामे कसले मागता? असा सवालही शेलार यांनी राज्य सरकारला केलाय. चूक पकडता येत नाही म्हणून राजकीय मुद्दा करा, असा राजकीय खेळ केला जात आहे. दरकेर यांनी कालही चांगलं काम केलं आणि आजही चांगलं काम करत आहे, याची ही पोचपावती असल्याची खोचक टीकाही शेलार यांनी राज्य सरकारवर केलीय.