मुंबई : तुरुंगाबाहेर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आज ऐन दिवाळीत आर्यन खानने एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात हजेरी लावली. कोर्टातून जामीन मिळवल्यानंतर आर्यनने पहिल्यांदाच एनसीबीसमोर हजेरी लावली. मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये एनसीबीने अटक केल्यानंतर शाहरूख खानचा पुत्र आर्यन खान जामीन मिळाल्यानंतर तब्बल २७ दिवसांनी तुरुंगाच्या बाहेर आला होता. जामीन देताना कोर्टाने त्याच्यावर १४ अटी घातल्या होत्या. त्यामध्ये दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याची अट घातली होती. त्यासाठीच तो आज एनसीबीसमोर हजर झाला.
सुमारे २७ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानला २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर २ दिवसांनी ३० ऑक्टोबर रोजी त्याला आर्थर रोड तुरुंगातून सोडण्यात आले होते. त्यानंतर तो मन्नत या निवासस्थानी रवाना झाल्यावर त्याच्या स्वागतासाठी शाहरूख खानच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
हायकोर्टाने आपल्या आदेशामध्ये आर्यन खान आणि सहआरोपी असलेल्या अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा यांना जामीन देताना १४ अटी घातल्या होत्या. कोर्टाने आर्यन खानला सांगितले की, त्यांना कुठल्याही आरोपीची भेट घेता येणार नाही, तसेच त्यांच्याशी बोलता येणार नाही. तसेच त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सक्त ताकीदही कोर्टाने आर्यन खानला दिली आहे. कोर्टाने आर्यन खानला त्याचा पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. तसेच शुक्रवारी ११ ते २ वाजण्याच्या सुमारास आर्यन खानने एनसीबीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. त्याबरोबरच आर्यन खानला एनडीपीसए कोर्टाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाता येणार नाही. एनसीबीने मुंबईजवळील समुद्रात एका आलिशान क्रूझवर एनसीबीने कारवाई केली होती. त्या कारवाईत शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य लोकांना अटक केली होती. एनसीबीने जहाजावरून अमली पदार्थ जप्त करण्याचा दावा केला होता.