मुक्तपीठ

कल चाचणी अर्थात अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

काळ – भूतकाळ. म्हणजे साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा.
प्रसंग – आणीबाणीचा. अर्थात चिरंजीव तिसऱ्या प्रयत्नात मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम पस्तीस टक्के मार्क्स मिळवून पास झालेले आहेत.
पिताश्री – छान दिवे लावलेत. आता पुढच्या शिक्षणाच्या नावाने माझा पैसा आणि तुमचं आयुष्य वाया घालवू नका. एक नगरसेवक ओळखीचा आहे. त्याला सांगून, गरज पडली तर थोडे पैसे खर्च करून म्युनिसिपालटीत चिटकवून देतो. कामाला लागा. तुम्हीही निवांत जगा आणि आम्हालाही निवांत जगू द्या.
चिरंजीव खाली मान घालून सगळं निमुटपणे ऐकून घेतात आणि पिताश्रींचा कल लक्षात घेऊन पुढच्या आठवड्यात म्युनिसिपालटीत शिपाई या सर्वोच्च पदावर निमूटपणे रुजू होतात.

————-

काळ – ( सर्वार्थाने) चालू वर्तमान काळ
प्रसंग – वरीलप्रमाणेच आणीबाणीचा . अर्थात चिरंजीव तिसऱ्या प्रयत्नात मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम पस्तीस टक्के मार्क्स मिळवून पास झालेले आहेत.
पिताश्री – हे बघ बेटा, नाराज होऊ नकोस. शिक्षणात हल्ली राम राहिलेला नाही. आपण तुझी कल चाचणी करवून घेऊ. काहीतरी मार्ग सांगतील ते.
चिरंजीव – आता उगाच पैसे वाचविण्यासाठी स्वस्तातलं काही शोधू नका. जरा चांगली इन्स्टिट्यूट शोधा. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे.
पिताश्री निमूटपणे सगळं ऐकून घेतात. दुसऱ्या दिवशी पिता पुत्र एका कल चाचणी करणाऱ्या नामांकित संस्थेत दाखल होतात. झालेल्या कल चाचणीचा थोडक्यात गोषवारा –
प्रश्न – आतापर्यंतचं शिक्षण व त्यातली प्रगती सांगा.
उत्तर – सर्व व्याप सांभाळून, अनेकांच्या प्रयत्नांनी आणि सहकार्याने तिसऱ्या प्रयत्नात दहावी पास झालो.
प्रश्न – याचा अभिमान वाटतो तुम्हाला ?
उत्तर – का नाही वाटणार ? बोर्डाने बक्षीस जाहीर केलं आहे आपल्याला. शाळेत रेकॉर्ड आहे आपलं.
प्रश्न – किती मार्क्स मिळाले ?
उत्तर – प्रत्येक विषयात पस्तीस !
प्रश्न – मित्रपरिवार किती मोठा आहे तुमचा ?
उत्तर – पंचवीस पोरांची गँग आहे आपली , सगळे एकापेक्षा एक टेरर.
प्रश्न – कोणत्या सामाजिक कामांमध्ये सहभागी व्हायला आवडतं ?
उत्तर – आपल्या एरियात दहीहंडी, होळी, गणपती सगळं आपणच करतो ना !
प्रश्न – सिनेमा पाहण्याची आवड आहे का ? असेल तर आवडलेल्या दोन चार सिनेमांंची नावं सांगा.
उत्तर – आवड आहे. ‘ जिने नही दूंगा’ ‘ जिंदा जला दूंगा’ ‘हमसे ना टकराना’
प्रश्न – जेवणात काय आवडतं, शाकाहारी की मांसाहारी ? विशेष आवडत असलेला पदार्थ सांगा.
उत्तर – अर्थात मांसाहारी. मटण बिर्याणी, साजूक तुपातली विशेष आवडते.
प्रश्न – आपले आवडीचे पदार्थ खाण्यासाठी साधारणपणे किती खर्च करता ?
उत्तर – खर्च ? आपल्या एरियात आपण बिर्याणीचे पैसे द्यायचे, मग आपली पोरं काय कामाची ? आपल्याकडून पैसे मागायला कोणाची मा – – – –
प्रश्न – कोणतीही नोकरी, कोणताही व्यवसाय केला तरी आपलं उत्पन्न किती असावं असं तुम्हाला वाटतं ?
उत्तर – महिन्याला शंभर कोटी !
प्रश्न – एवढे पैसे कमवायचे म्हणजे माणसं लागतील ना मदतीला ?
उत्तर – हो.
प्रश्न – मग त्यांना किती पैसे देणार तुमच्या शंभर कोटीतून ?
उत्तर – छट्. शंभर कोटी तर माझं टार्गेट आहे. वरचे काही आले तर त्यांनी घ्यावे.
प्रश्न – असे महिन्याला शंभर कोटी कमविण्यासाठी कोणती नोकरी, कोणता धंदा तुमच्या डोळ्यासमोर आहे ?
उत्तर – त्यासाठी मी कशाला काही करायला हवं ? इतर माणसं करतात की धंदा. आपली पोरं करतील ना वसुली !
प्रश्न – कोणी तुमच्याशी पंगा घेतला तर तुम्ही काय कराल ?
उत्तर – कोणी यावं तर आपल्या एरियात. येतांना आपल्या पायांवर येईल, जातांना चार लोकांच्या खांद्यांवरच जाईल.
प्रश्न – ते कसं ?
उत्तर – अशी एक झापड देईन ना की, परत उठणारच नाही.

————-

दोन दिवसांनी कल चाचणीचा निष्कर्ष घरी पाठविला जातो.
‘ चिरंजीवांची अजिबात काळजी करू नका. त्यांनी अभ्यासात थोडं लक्ष घातलं तर मोठे अधिकारी होतील, नाहीतर राजकारणात जाऊन सत्ता मिळवतील !’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button