शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.
पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळून आला होता. आज तो अल्सर काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान, शरद पवारांची तब्येत चांगली असून ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावाही ते घेत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच, ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरु करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. याआधी मागील महिन्यात पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्तशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. आज पुन्हा एक त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या तोंडातील अल्सर काढून टाकण्यात आला आहे.