परमबीर सिंग यांच्यावर २ कोटींच्या खंडणीचा आणखी एक गुन्हा
ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फुलपगारे करत आहेत.
याआधी, परमबीर सिंग, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा श्याम सुंदर अगरवाल यांनी केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.