राजकारण

शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा

मुंबई : अलीकडेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. या पत्रातून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. असा आरोप केला होता. सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

पत्रात विजय शिवतारे म्हणतात की, गुंजवणी धरण मी राज्यमंत्री असताना मोठ्या मेहनतीतून पुरंदर, भोर आणि वेल्हे या तीन तालुक्यांना वरदान ठरेल यासाठी पूर्ण केले होतं. या धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती. त्यासाठी १३१३ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. वेल्हे आणि भोरचं काम पूर्ण झालं. परंतु पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वी या योजनेचे काम बंद करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.

याठिकाणचे स्थानिक आमदार संजय जगताप यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. इतकचं नाही तर अधिकाऱ्यांना धमक्या देऊन गुंजवणीचं पाणी पुरवठा काम बंद केले आहे. या कामाचं भूमिपूजन स्वत:च्या हस्ते व्हावं यासाठी आमदारांचा आग्रह आहे. ही योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतून जलसंपदा विभागाशी समन्वय साधत मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली. जलवाहिनीद्वारे १०० टक्के सूक्ष्म सिंचन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी १३१३ कोटींची मंजुरी मिळवण्यात मला यश आलं. मात्र हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्याकडे सातत्याने याचिका करून हे काम होऊ नये यासाठी मला त्रास देण्यात आला. ज्यांनी या प्रकल्पाचं काम बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले त्यांच्याच हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्या इतकी शोकांतिका असून शकत नाही असं विजय शिवतारे यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय या कामाचा शुभारंभ आपल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल अशी इच्छा विजय शिवतारेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button