महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आणि राज ठाकरेंकडून शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ मार्च) १५ वा वर्धापन दिन आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. नुकतंच मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंनी ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा,” असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक असे टॅग वापरले आहेत. तसेच राज ठाकरेंनी या ट्वीट केलेल्या फोटोत किल्ल्याचा बुरुज पाहायला मिळत आहे. त्याला फुलांच्या रंगेबेरंगी माळांनी सजवण्यात आले आहे. तसेच नुकताच होणारा सूर्यादय आणि आकाशात उंच भरारी घेणारा एक पक्षी दिसत आहे. या फोटोवर 15 वा वर्धापन दिन, तमाम महाराष्ट्र सैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा असे लिहिण्यात आले आहेत.
दरवर्षी मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये वर्धापनदिनानिमित जय्यत तयारी करण्यात येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्यावर्षी वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आले होते. पण आज राज्यभर मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार आहे. गेल्या 14 वर्षापासून कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता महाराष्ट्रहितासाठी कार्यरत असलेले असंख्य महाराष्ट्र सैनिक पक्षासोबत आहेत. पद नसतानाही त्यापैकी अनेकजण उत्तम कामगिरी बजावत आहेत.
यात ज्यांना स्वतः निवडणूक लढण्यात स्वारस्य नसेल, पण संघटनात्मक काम करण्यास इच्छुक असतील, अशा महिला- पुरुष महाराष्ट्र सैनिकांनी, हितचिंतकांनी आपलं नाव, संपूर्ण पत्ता नोंद करावी. यानंतर पक्षाकडून संबंधितांशी संपर्क साधला जाईल. यात निवड झालेल्या व्यक्तींना योग्य ती संघटनात्मक जबाबदारी देण्यात येईल. गेल्या वर्षी 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली होती. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.