अण्णा हजारेंकडून उपोषणाचा निर्णय मागे !
राळेगणसिद्धी : राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे १४ फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली. दरम्यान, यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांना वयाचा विचार करून उपोषण निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले होते. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही. याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे म्हणाले होते.
गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे अण्णांनी पत्रात म्हटले होते.
…तर मीही अण्णा हजारे यांच्यासोबत उपोषणाला बसेन; नवनीत राणा यांचा इशारा
किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी उपोषण करणार नसल्याचे आज जाहीर केले. मात्र याच दरम्यान आता अमरावतीच्या खा. नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. किराणा दुकानातील वाईन विक्रीमुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. वाईनचा निर्णय जर या सरकारने मागे घेतला नाही तर मी सुद्धा, वेळ पडली उपोषणात सहभागी होईन, असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.