मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. गेल्या आठवडाभरापासून शेकडो एसटी कर्मचारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी फडणवीस यांनी काही सूचना केल्याचं परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अद्याप संपलेला नाही. कर्मचाऱ्यांना सकाळी पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टानं नेमलेली कमिटीच निर्णय घेईल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी राज्याचा कारभार हाकला आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही सूचना केल्या आहेत. फडणवीसांच्या सूचनांवर आम्ही विचार करु, असं अनिल परब म्हणाले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही परब म्हणाले.
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत, पण…?
आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असं अनिल परब यांनी दुपारी सांगितलं होतं.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना इशारा
रोजंदारी कर्मचाऱ्यांना काल नोटीस दिलीय. आज २४ तासची वेळ संपत आहे. कोण कामावर येत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संपकरी कामावर न आल्यास २०१६-१७ आणि २०१९ च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. कायदेशीर प्रक्रिया करूनच कारवाई केली जाईल. लोकांची सहानुभूती गेल्यास मग कर्मचारी अडचणीत येतील. सरकार चर्चेसाठी तयार आहेच. सर्व गोष्टींचा अभ्यास करून समिती अहवाल देईल. त्यातून लगेच मार्ग निघणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.