अनिल देशमुखांचा तत्काळ राजीनामा घ्या; देवेंद्र फडणवीसांची मागणी
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अत्यंत खळबळजनक आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यामुळे मुंबई पोलिसांची मानखाली गेली आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेतून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्याचे गृहमंत्रीच पोलिसांना वसूली करायला सांगणं ही गंभीर बाब आहे. पोलीस दलाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ही घटना म्हणजे कळस आहे. इतक्या वाईट प्रकारे ही परिस्थित समोर आल्याने देशमुख पदावर राहू शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं सांगतानाच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. सेंट्रल एजन्सीकडून ही चौकशी व्हावी. सेंट्रल एजन्सी नको असेल तर कोर्टाच्या अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
तेव्हाच कारवाई करायला हवी होती
देशमुखांवर करण्यात आलेला आरोप हा राजकीय नाही. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने हा आरोप केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात सरकारने नैतिक भूमिका घेतली पाहिजे. जे बोलतात ते कृतीत उतरवलं पाहिजे, असं सांगतानाच परमबीर सिंग यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या नजरेला आणून दिले असतील तर त्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे होती. तेव्हा कदाचित सरकारला धोका असल्याचं लक्षात आल्याने कारवाई केली नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पत्रात थेट पुरावा, मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी अजून काय हवं?
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात सिंग यांनी काही पुरावेही जोडले आहेत. त्यात विविध चॅटचा समावेश आहे. हे चॅट म्हणजेच मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्र्यांना अजून कुठला पुरावा हवा आहे? असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केलाय.
राज्य सरकारनं नैतिक भूमिका घेतली पाहिजे, मुख्यमंत्री जे बोलतात त्यांनी ते कृतीत उतरवायला हवं. परमबीर सिंग यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं आहे. असं असेल तर त्यावेळी कारवाई व्हायला हवी होती. तेव्हा या प्रकरणावरुन सरकारला धोका निर्माण होईल अशी भीती मुख्यमंत्र्यांना असावी. पण आता कुठल्याही परिस्थितीत कारवाई करायला हवी, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
मुंबईचा पोलिस आयुक्त हा राज्याच्या गृहमंत्र्यावर बोट ठेवण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहितो हा सगळा विषय महाराष्ट्राला मान खाली घालणारा आहे. तसेच राज्याच्या पोलिस दलाला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच तथ्य बाहेर येईपर्यंत गृहमंत्री पदावर राहू नये असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याच्या गृहमंत्र्यांवर हे सगळे आरोप राज्याचा सर्व्हींग महासंचालक करतो आहे हे गंभीर असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच या प्रकरणात अत्यंत कडक कारवाई होणे गरजेचे आहे असे मत फडणवीस यांनी मांडले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे तो अत्यंत गंभीर आरो आहे. म्हणूनच या प्रकरणाचे गांभीर्य खूप आहे.