अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागणार?
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाने देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी देशमुख सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख हे मुंबईतून दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारवर नामुष्की ओढवली आहे.
अनिल देशमुख दिल्लीला गेले तरी ते कोणाला भेटणार याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद न साधता थेट विमानतळ गाठले होते. त्यामुळे देशमुख नागपूरला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सायंकाळी ५ च्या विमानाने देशमुख थेट दिल्लीला गेले. तेथे ते राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सध्या आजारपणामुळे मुंबईत आहेत. यामुळे देशमुख पटेलांना भेटून सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे परमबीर यांनी सुरुवातीला या पत्रातील आरोपांच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतू न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यात सांगितले होते.