मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने अनन्याला पांडेला २१ ऑक्टोबर रोजी समन्स पाठवून दुपारी २ वाजता हजर राहण्यास सांगितले. पण ही चौकशी पूर्ण झाली नसल्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा अनन्याला समन्स बजावून बोलावले. यादिवशी अनन्या एनसीबी कार्यालयात वेळेवर हजर राहिली नाही. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्याला झापले. त्यानंतर आज पुन्हा अनन्याला समन्स बजावून सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आज अनन्या एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे एनसीबीच्या सुत्रांकडून समोर आले आहे.
एनसीबीच्या सुत्रानुसार अभिनेत्री अनन्या पांडे आज एनसीबीच्या चौकशीला हजर राहणार नाही. वैयक्तिक कारणास्तव तिने एनसीबीला पुढील चौकशीची तारीख देण्याची विनंती केली आहे. एनसीबीने तिची विनंती स्वीकारली असून लवकरच दुसऱ्या नवीन तारखेचा समन्स जारी करण्यात येईल. माहितीनुसार, अनन्याची तब्येत बरी नसल्यामुळे ती आज एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नाही, असे म्हटले जात आहे.
दरम्यान २१ ऑक्टोबर रोजी एनसीबीने अनन्याची २ तास चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ तास अनन्याची चौकशी करण्यात आली होती. या दिवशी अनन्याला ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ती तीन तास उशीरा एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली होती. उशीरा आल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला चांगलेच फटकारले. वानखेडे म्हणाले की, ‘तुला ११ वाजता बोलावले होते आणि तू आता आली आहेस. तुझी वाट पाहण्यासाठी अधिकारी इथे बसले नाही आहेत. हे तुझे काही प्रोडक्शन हाऊस नाही आहे, केंद्रीय एजन्सीचे ऑफिस आहे. ज्या वेळेत बोलावले जाईल त्या वेळेतच हजर राहायचे.’ त्यामुळे आजतरी अनन्या वेळेत हजर राहते का? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र आज अनन्या वैयक्तिक कारणास्तवर हजर राहणार नसल्याचे एनसीबीला स्पष्ट केले आहे