अमरावती हिंसाचार हा एक प्रयोग; फडणवीसांचा ‘अर्बन नक्षलवादा’वर हल्लाबोल
मुंबई : बंदूक हाती असणार्यांचा मुकाबला करणे सोपे आहे. पण, जे येणार्या पिढ्यांना विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण आहे आणि त्यामुळेच अर्बन नक्षलवादाचे षडयंत्र समजून घ्यावे लागेल. अमरावतीत झालेला प्रकार तर सर्वांनीच पाहिला. तो संयोग नव्हे तर प्रयोग होता, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. ‘डाव्यांची विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. ज्येष्ठ विचारवंत सु. ग. शेवडे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, रवींद्र चव्हाण आणि इतरही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अमरावतीत मोठा हिंसाचार झाला. त्रिपुरात ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या. त्रिपुरात सीपीआयच्या इमारतीला आग लागली, त्याचा फोटो मशिदीच्या नावाने व्हायरल केला गेला. दिल्लीत पुस्तकं जाळती तर त्याचे फोटो कुराण जाळलं म्हणून व्हायरल केले गेले. यांची इकोस्टिस्टिम आहे. एकाने ट्विट केलं की दुसऱ्याने करायचं, अशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर कसे अत्याचार होत आहेत याचं नरेटिव्ह तयार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
गरिब आदिवासींना भडकावून पाय पसरण्याचे काम जेव्हा अपयशी ठरू लागले, तेव्हा ‘अर्बन नक्षलवाद’ जन्माला आला. विचारवंतांचा बुरखा पांघरून केले जात असलेले हे काम आमच्या पोलिसांनी रोखले आणि त्यांचे भारतविरोधी षडयंत्र उघडकीस आणले.#urbannaxal #left pic.twitter.com/sjCifmHGxR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2021
काहीही संबंध नसताना महाराष्ट्रात ५०-५० हजाराचे मोर्चे निघाले. वाटेत हिंदूंची दुकानं तोडली, जाळली. दुसऱ्या दिवशी ज्यांची दुकानं जाळली ते रस्त्यावर आले की पोलिसांनी कारवाई करायची. पण आदल्या दिवशीची घटना डिलीट करुन टाकायची असा प्रयोग सुरु आहे. मोदी सरकार हटवता येत नाही त्यावेळी अशा पद्धतीने मुठभर विचारवंत अराजक निर्माण करतात. असे प्रयोग संपवावेच लागतील. हे उदारमतवादी नव्हे तर उधारमतवादी आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
विकासाच्या आधारावर सरकारशी लढता येत नाही, मा. नरेंद्र मोदीजींना कुठल्याही कारणाने बदनाम करता येत नाही, हे लक्षात आल्याने असे विविध प्रयोग देशभर सुरू आहेत. राष्ट्रीय बाणा जागा ठेवायचा असेल तर तुम्हा-आम्हा सर्वांना अधिक जागरुक व्हावे लागेल.#Nationalism @narendramodi pic.twitter.com/avGKvJsEyO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2021
डावी विषवल्ली डोक्यात विष पेरुन आपलं वाईट आणि इतर विचार चांगले हे भाव तयार करत आहेत. अशा परिस्थितीत सच्चिदानंद शेवडे राष्ट्रवादी विचार मांडतात. मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून डावी विषवल्ली आपल्याला कशी पोखरते हे पाहण्याची दुर्दैवी संधी मला मिळाली आहे. आदिवासींच्या माध्यमातून नक्षलवादी विचार मांडण्याचा विचार व्हायचा. पोलिसांनी त्यांचा नायनाट सुरु केला. त्यावेळी नक्षलवाद कमी होऊन फक्त वसुलीपुरता उरला. त्यावेळी डाव्यांच्या लक्षात आलं की आदिवासींना आता फार काळ वापरता येणार नाही. त्यावेळी अर्बन नक्षलवाद उदयाला आला आहे, असं फडणवीस म्हणाले.
मोठमोठ्या शहरात विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये विचारवंतांचा बुरखा घालून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रविरोधी भावना निर्माण करुन अराजकता निर्माण करायची असा अर्बन नक्षलवाद सुरु झाला. हे चेहरे ओळखायला वेळ लागला. कुणी प्राध्यापक, कुणी विचारवंत, कुणी पत्रकार असे बुरखे घातले गेले होते. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर आमच्या पोलिसांनी त्यांचे बुरखे फाडले. त्यावेळी त्यांच्याकडे जे साहित्य सापडलं त्यात संपूर्ण भारत पोखरुन काढण्याची स्ट्रॅटेजी सापडली, असा दावा फडणवीस यांनी केलाय. यांना चीन, पाकिस्तान आयएसआयकडून फंडिंग होतं. जे बंदुका घेऊन जातात त्यांना बंदुकीनं मारणं सोपं आहे. पण जे आमच्या मुलांची डोकी पोखरतात त्यांना शोधून काढणं कठीण असल्याचंही फडणवीस यावेळ म्हणाले.