Top Newsराजकारण

मुख्यमंत्रीपद जातात अमरिंदर सिंग यांचा राहुल-प्रियंका गांधींवर निशाणा

चंदिगड : गेले काही महिने पंजाबकाँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची अखेर अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याने झाली होती. दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धूविरोधात थेट मोर्चा उघडला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धूला पराभूत करण्यासाठी त्याच्याविरोधात एक प्रबळ उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभव नसल्याचे विधान त्यांनी केले.

अमरिंदर सिंग यांनी आज सांगितले की, मी नवज्योत सिंग सिद्धूला पंजाबचा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेन. जर पक्षाने सिद्धूला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवले तर मीसुद्धा त्याला रोखण्यासाठी सज्ज आहे. नवज्योत सिंग सिद्धू हा धोकादायक माणूस आहे. अशा लोकांपासून देशाला वाचवण्याची गरज आहे. सिद्धूला हरवण्यासाठी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्याच्याविरोधात एक प्रबळ उमेदवार उतरवला जाईल. सिद्धू राज्यासाठी धोकादायक आहे. त्याला रोखण्यासाठी मी कुठलेही पाऊल उचलेन.

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी यावेळी सांगितले की, मी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तीन आठवड्यांपूर्वीच राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी मला पदावर कायम राहण्यास सांगितले. जर त्यांनी मला बोलावून राजीनामा द्यायला सांगितला असता तर मी लगेच राजीनामा दिला असता. एक सैनिक म्हणून कसे काम करायचे आणि परत कसे यायचे हे मला माहिती आहे.

यावेळी अमरिंदर सिंग यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे अनुभवहीन असल्याचेही विधान केले. ते म्हणाले की, प्रियंका, राहुल गांधी मला माझ्या मुलांसारखे आहेत. कुठलीही गोष्ट अशाप्रकारे संपता कामा नये. मी दु:खी आहे. राहुल आणि प्रियंका अनुभवी नाही आहेत. त्यांच्या सल्लागारांनी त्यांना पूर्णपणे चुकीची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button