नवी दिल्ली : मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून एकीकडे नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत असून, दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह पंच के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या २५ कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत समीन वानखेडे यांना बाजूला ठेवावे, असे म्हटले जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
जे काही आरोप लागले आहेत त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती योग्य प्रकारे होईल. जर एनसीबीला तसे वाटले ही चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवले पाहिजे तर ते तसा निर्णय घेतील. त्यांना तसे वाटले नसेल. तसेच शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल. अशी पद्धत पाडणे योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील. शेवटी यासंदर्भातील निर्णय करायला मी अधिकारी नाही आणि मला त्यात बोलण्याचा अधिकारही नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत माफियांची वकिली करतात का?
संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करत आहेत का, अशी विचारणा करत मुंबई आणि महाराष्ट्राला ज्याप्रमाणे ड्रग्जचा विळखा पडला आहे, तरुणाई बर्बाद होतेय, त्याविरुद्ध लढायच्या ऐवजी संजय राऊतांसारखे लोकं त्यांना समर्थन देत असतील, तर आपण म्हणतो ना की, ईश्वरच मालक आहे, अशीच परिस्थिती निर्माण होईल. परंतु, मला त्यांना उत्तर द्यायची इच्छा नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. संजय राऊत यांचा उद्देश एवढाच आहे की, मूळ मुद्द्यांपासून सगळ्या गोष्टी, सगळे लक्ष भटकले पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.