आरोग्य

रुग्णसंख्या घटल्यानंतर तेलंगणातील सर्व निर्बंध उठवले !

हैदराबाद : देशात करोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहे. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही बाब स्पष्ट केली आहे. तेलंगाणा सरकारच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना रुग्णांच्या संख्या घट होत आहे. त्याचबरोबर करोना नियंत्रणात आहे, असं सरकारने सांगितलं आहे. तेलंगणात शुक्रवारी १ हजार ४१७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना रुग्णसंख्या ६ लाख १० हजार ८३४ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एकूण ३ हजार ५४६ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात देखील टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, असं असताना अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनलॉकसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button