Top Newsआरोग्य

राज्यात उद्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस : राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रात २२ जून अर्थात उद्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण उद्यापासून केलं जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लसीकरणाची गती वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं टोपे म्हणाले. त्यामुळे १८ वयापासून पुढील सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर जाऊन कोरोना लस घ्यावी अशी विनंती टोपे यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वीच १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने लसीच्या तुटवड्यामुळे अद्याप १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात नव्हती. मात्र, आता १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस दिली जाणार आहे.

दरम्यान, देशभरात केंद्र सरकार आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून लसीचा एकूण ७५ टक्के भाग केंद्र सरकार खरेदी करणार आहे. या लसी केंद्राकडून राज्य सरकारांना पाठवल्या जाणार आहे. तर २५ टक्के लसीचे डोस खासगी रुग्णालये थेट उत्पादकांकडून विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

केंद्र सरकारने जरी मोफत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची घोषणा जरी केली असली तरी मुबलक लस मिळेल का हा प्रश्न आहे यामुळे राज्य सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेने लसीकरणचा संभाव्य प्लॅन तयार केला आहे. काही खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण सुरू आहे. खासगी सेंटरवर हजारो रुपये मोजुन श्रीमंतांनाच या वषोगटासाठी लस मिळाली. आता सर्वात मोठ्या लोकसंख्येसाठी सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण पार पाडण्याचा टप्पा आलाय. देशभरात बहुप्रतिक्षीत असलेलं तरुणांचं मोफत लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.

मुंबईत टप्पे पाडून लसीकरण केले जाईल. विशेष करून सुपरस्प्रेडरना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. व्यवसायानुसार सुपर स्प्रेडर गट जसे- फेरीवाले , रिक्षाचालक यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य दिले जाईल.तसेच गुरुवार ते शनिवार या दिवशी नोंदणीकृत लोकांचे लसीकरण केले जाते त्या दिवशी काही प्रमाणात वॉक इन लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईत २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. आरोग्य शिबीरासारखे लसीकरण सुरू करू. तसेच राहत्या घरापासून जवळ नागरिकांना लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचेही किशोरी पेडणकेर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button