राजकारण

काँग्रेसचे सर्व आमदार एक महिन्याचे, तर बाळासाहेब थोरात एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

मुंबई : राज्यात मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा काल महाविकास आघाडी सरकारने केली. याचा ताण राज्य सरकारच्या तिजोरीवर येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार त्यांचं एक महिन्याचं वेतन आणि बाळासाहेब थोरात त्यांचं पूर्ण एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची माहिती खुद्द महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याचा ताण राज्याच्या तिजेरीवर येणार आहे. हा ताण कमी करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणार आहे. काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन तर बाळासाहेब थोरात स्वत: एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. “मला जे काही मानधन मिळतं ते एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. तसंच काँग्रेसचे विधीमंडळाचे ५३ सदस्य आहेत. हे ५३ सदस्य एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतिने ५ लाख रुपये देणार आहोत,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“माझं व्यक्तीगत सांगायचं तर आमचा अमृत उद्योग समुह आहे. तिथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी सर्व एकत्र केले तर ५००० एवढे लोक आहेत. त्यांच्याकरिता येणारा खर्च सुद्धा आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत,” असं थोरात यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button