मनोरंजनराजकारण

रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर संतप्त, थेट धर्मांतराची घोषणा

कोची: मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या कृत्यामुळं व्यथित होऊन अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटलं आहे. अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे.

मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनी देखील अशा कृत्यांचा निषेध नोंदवलेला नाही. भारतीय संरक्षण दलाच्या शौर्यवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासंदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, असं अली अकबर म्हणाले. अली अकबर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भातील घोषणा केली आहे.

धर्मांतर करण्याच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन पत्नीसह हिंदू धर्मात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य अली अकबर यांनी केलं आहे. मात्र, दोन्ही मुलींना धर्मांतर करण्यासाठी सक्ती करणार नसून त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा असल्याचंही अली अकबर म्हणाले. अली अकबर भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे होते. मात्र, पक्ष नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला होता.

आज मी मला जन्मापासून मिळालेली ओळख फेकून देत आहे. आजपासून मी मुस्लीम नसून भारतीय आहे. भारताविरोधात स्माईली पोस्ट करणाऱ्या हजारो लोकांविरोधातील ही माझी प्रतिक्रिया असल्याचं अली अकबर म्हणाले आहे. अली अकबर यांनी देखील कमेंटसला प्रत्युत्तर देताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. त्यानंतर ती पोस्ट फेसबुकवरुन हटवली गेली मात्र ती व्हॉट्स अ‍ॅपवरुन शेअर करण्यात आली आहे.

देशानं सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी पोस्ट देखील केली आहे. या पोस्टवर देखील सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून आले, काही जणांनी अली अकबरचं समर्थन केलं, तर काही जणांनी त्याच्या विरोधात कमेंट केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button