मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबांना आदरांजली वाहिली. रोखठोक अजित पवार आबांविषयी बोलताना कायम हळवे होतात. आजही आबांच्या जयंतीदिनी आबांविषयी भावना व्यक्त करताना अजित पवार भावूक झाले.
ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या आबांच्या निर्णयाने हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली. डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले. शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेलं, आपलंसं वाटणारं त्यांचं नेतृत्व होतं, असं सांगत स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केलं.
आघाडी सरकारमध्ये आर आर आबांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. ग्रामविकास, गृह आणि पुढे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि धोरणी निर्णय घेतले. ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर असताना संपूर्ण राज्यभरात त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवलं. याच कामाने आबांना वेगळी ओळख मिळाली. गावंच्या गावं स्वच्छ झाली, लोकांनी एकत्र येऊन गावं स्वच्छ केलीच पण यानिमित्ताने अनेकांची मनंही स्वच्छ झाली…!
गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं.. गावातल्या लोकांनी भांडणांपासून लांब रहावं आणि जरी भांडण-तंटे झाले तरी कोर्ट कचेरीची पायरी न चढता ते भांडणं गावातच मिटलं जावं, असा त्यापाठीमागचा उद्देश… या अभियानामुळे तुटलेली मनं जवळ आली…. अनेक गावांत कित्येक वर्षांचे भाऊबंदकीतले वाद संपले… दोन-दोन दशकांपांसून असलेले वाद संपुष्टात आले. गावात खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदू लागली… गावांनी विकासाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकलं…
आबांनी गृहमंत्री असताना मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली… त्यामुळे गोर-गरिबांची अनेक पोरं शासकीय सेवेत आली. पर्यायाने अनेक कुटुंबांची गरिबी संपली… पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायला मिळाले… पण शासकीय सेवेत गेलेल्या गरीबांच्या पोरांना आबा सक्त ताकीद देत… की लग्न करताना हुंडा घ्यायचा नाही, आता आपली गरिबी संपली म्हणजे मुलीच्या घरच्यांना कर्जाच्या खाईत लोटाचयं नाही… अशा पद्धतीने पोरी-बाळींच्या बापाचा विचार करणारा राजकारणी विरळाच…
आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबारवरील बंदी…डान्सबारमुळे अनेक तरुण वाममार्गाला लागतात… अनेकांचे संसार उध्वस्त होतात… अनेक तरुण पोरांनी जमिनी विकून त्यातून आलेला पैसा बारमध्ये बारबालांवर उधळला… स्वतःचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतलं… अशा डान्सबारवर बंदी घालणं आवश्यक होतं… डान्सबारवर बंदी घालायचीच, असा पण आबांनी केला आणि त्यांनी तो पूर्णही करुन दाखवला. आबांच्या निर्णयाने अनेक लेकी-बाळींचे संसार वाचले… आजही कित्येक माता माऊल्या आबांना याच कामामुळे आशीर्वाद देतात… आबांबद्दल भरुभरुन बोलत असतात… हीच आबांच्या कामाची पोचपावची….
लाठी काठी आणि कायद्याचा धाक दाखवणारं खातं म्हणजे गृहखातं, पण आबांनी या खात्याचा उपयोग माणसाची मनं सांधण्यासाठी केला… सत्ता सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उत्थानासाठी वापरायची असते, हे आबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं, असा अजितदादांनी सांगितलं.