पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित ७ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीमधून ५२ मतं मिळाली आहेत, त्यामुळे ‘साथ कोणी दिली? बारामती’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार ७३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे २७ मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.
भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं?
विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना पराभूत करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पण तरीही कंद यांनी लिलया विजय मिळवून अजितदादांचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यामुळे प्रदीप कंद अचानक चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र या जागेवर सुरेश घुलेंचा १४ मतांनी पराभव झाला.
सर्व पक्षांनी केलेल्या मदतीमुळे माझा विजय शक्य झाला. अजित पवार यांना मला बोलण्याचा अधिकार आहे. मतं फुटली. पण कोणती फुटली हे सांगणं योग्य नाही, अशी सूचक प्रतिक्रिया कंद यांनी व्यक्त केली.
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०१४ मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या निवडणुकी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कंद यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून पुना हॉस्पिटल आणि नंतर मुंबईच्या लिलावतीत दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज त्यांच्या उपचाराचा आढावा घेत होते. फडणवीस रोज लिलावतीत फोन करून त्यांच्या आजारपणाची माहिती घेत होते. स्वत: कंद यांनी आपला हा अनुभव सांगितला होता.
एका जागेचं वाईट वाटतंय, अजित पवारांची प्रतिक्रिया
एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. अजित पवार यांना हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी या निकालावर व्यक्त केली आहे. निवडून आलेल्यांचं स्वागत करतो. एका ठिकाणी का आम्ही कमी पडलो याची बारकाईने माहिती घेतो. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे ११ मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे, असं अजितदादा म्हणाले.
मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई जिल्हा बँक निवडणूक ही एक पक्ष म्हणून निवडणूक नव्हती, पक्ष विरहित निवडणूक होती. पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतला, असंही अजित पवारांनी सांगितलं.