बारामती : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात रंगलेते राजकीय नाट्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. सिंधुदुर्गच्या एका नेत्याने जे काही भाषण केलं पार विचारायचं सोय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय गप्प बसतील. त्यांनीही जशास तसे उत्तर दिले. पार बाभळीची उपमा दिली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची खिल्ली उडवली.
चिपी विमानतळाचे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बारामती येथे झालेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. काही लोकं गालबोट लावण्याचं काम करत असतात. लोकांच्या पुढे काय काम केलं हे सांगायचं असतं. सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळाचं लोकार्पण झालं. पण तिथेही तोच प्रकार घडला. मी त्या ठिकाणी विकास कामांवरच बोललो. ते विमानतळ काय एकट्या दुकट्याने तयार करण्याचं काम नाही. यासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केला आहे. २५ वर्षांपूर्वी विमानतळाचं भूमिपूजन झालं. हा आनंदाचा क्षण होता, सर्वांनी मिळून मिसळून आनंदात सहभागी होण्याचं काम होतं. एक नेते उठले आणि आणि भाषण हाणलं की विचारायची सोय नाही. ते भाषण झाल्यावर मग मुख्यमंत्री तरी कसे गप्प बसतील. त्यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलं पार बाभळीची उपमा दिली, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांना चांगलाच टोला लगावला.
शरद पवार यांनी आपल्याला नेहमी विकासावर बोलण्याचे शिकवले आहे. बारामतीत शरद पवार यांच्यावर टीका जर कुणी केली तर त्याची मतं पडतात. त्यामुळे इतर नेते नेहमी सांगता की पवारांवर टीका करू नये, असंही अजित पवार म्हणाले.