कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले असून राज्यभर दौरा करत आहे. दुसरीकडे आज कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, संभाजीराजे यांनी १६ तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, दुसरीकडे संभाजीराजे मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी मराठा समाजातील तरुणांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला संभाजीराजेंनी पत्रातूनच उत्तर दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “माओवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, असं आवाहनच संभाजीराजेंनी केलं आहे.