मुंबईत हवाई रुग्णवाहिकेचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; ‘टेक ऑफ’ दरम्यान चाक निखळले
मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एका हवाई रुग्णवाहिकेचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्याची इमर्जन्सी लँडिग करावे लागले. या विमानात १ रुग्ण, १ डॉक्टर, १ नर्स आणि वैमानिकांसह एकूण ७ जण होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, C-90 VT-JIL हे बीचक्राफ्ट कंपनीचे विमान होते. या विमानाने रात्री ८ च्या सुमारात नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी उड्डाण घेतले. नागपूर विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा उजव्या चाकात बिघाड झाला. त्यामुळे ते चाक निखळून पडल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘बेली लँडिंग’ प्रकारे हे विमान मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवले. त्यावेळी हवाई रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. वैमानिकाने सर्व कसब पणाला लावून विमानाचे लँडिग केले. हवेत जवळपास आठ घिरट्या घेतल्यानंतर विमान सुखरुप खाली उतरवण्यात आले. या दरम्यान विमानाला आग लागण्याची भीती होती. त्यामुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिकेसह इतर सर्व गोष्टी सज्ज करुन ठेवल्या होत्या. हे विमान खाली उतरवल्यानंतर त्यातील प्रवाशांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान अग्निशमन दलाने काही तास विमानावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे त्या विमानाची उष्णता शांत झाली.