नवी दिल्ली : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. इटलीमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेला मोदी उपस्थिती लावणार आहेत. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी इटलीच्या रोममध्ये जी-२० शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. यात मोदींसह अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांची उपस्थिती असणार आहे.
जी-२० शिखर परिषदेसोबतच पंतप्रधान मोदी काही राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठक देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात दौऱ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारकडून जोरदार तयारी केली जात आहे. अर्थात अद्याप मोदींच्या युरोप दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोना प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच जी-२० शिखर परिषदेचे सदस्य देशांचे नेते असे एकत्रितरित्या भेटणार आहेत. याआधीची परिषद व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडली होती.
गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जी-२० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं होतं. मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाची विधानं केली होती. यात मोदींनी दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोना महामारी हे संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या परिषदेला उपस्थित होते. परिषदेचं अध्यक्षपद सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी भूषवलं होतं.
याआधी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचा तीन दिवसीय दौरा केला. मोदींनी या दौऱ्यात अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यासोबतच राष्ट्रपती ज्यो बायडन यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदींसोबत यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव श्रृंगला देखील उपस्थित होते.