एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
पुणे : अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एका एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं प्रकरण भीषण आहे. हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही का ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केलाय. ते पुण्यात बोलत होते.
एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्ये इतकंच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं प्रकरण भीषण आहे. हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही का ? आत्महत्या नव्हे तर ही सरकारी कारभारातून झालेली हत्या आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
इंधन दरवाढ, कोरोना, लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा तोडा सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मंडळाकडे कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठीदेखील पैसे नाहीत. याच कारणामुळे राज्यातील एसी कर्मचारी संप, उपोषण तसेच आंदोलन करत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हाच मुद्दा घेऊन राज्य सरकारला लक्ष्य केलंय. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र आतापर्यंत राज्य सरकारचा एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही. असे असताना दुसरीकडे मात्र ठाकरे सरकारमधील मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटकेबाबत प्रयत्न करत आहेत. हे सरकार गांजा माफियांच्या मागे आहे, असा आरोप पडळकर यांनी पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.
अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा पुण्यात कंपनीमध्ये आहे, तर दुसरा मुलगा संस्थेमध्ये नोकरी करत असून मुलीचे लग्न झाले आहे.