राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भावना अनावर
चंदिगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली आहे. अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अवमान होत असल्याचे सांगितले. अमरिंदर सिंग म्हणाले, पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले असे वाटते की, पक्षाला माझ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मी सकाळीच ठरवले की, मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे. आता पक्षाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला त्यांनी मुख्यमंत्री बनवावे. आता भविष्यातील राजकारणाबाबत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी निर्णय घेईन. सध्यातरी मी काँग्रेसमध्ये आहे. आता सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेईन.
या नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर
अमरिंदर यांचा राजीनामा झाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी तीन नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. तेच पंजाबचे भावी मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. सुनील जाखड यांनी राहुल गांधी यांचे ट्विट करून कौतुक केले होते. वाह राहुल गांधी तुम्ही खूप गुंतागुंतीचा बनलेला तिढा सोडवला आहे. आश्चर्यजनकपणे नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयामुळे पंजाब काँग्रेसमधील वाद मिटवला आहे. या निर्णयाने कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले आहेत. तसेच या निर्णयाने अकालींचा पाया उखडून टाकला आहे.
पंजाब काँग्रेसचे महासचिव परगट सिंह यांनी सांगितले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटण्याचे आदेश देण्यात आले आहे. अंबिका सोनी, सुनील जाखड आणि अन्य एक नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचे नावही आघाडीवर आहे. यूपीएस सरकारमध्ये त्या माहिती आणि प्रसारणमंत्री होत्या.
या दोन्ही नेत्यांसोबत नवज्योत सिंग सिद्धू यांचे नावही आघाडीवर आहे. सिद्धू जर कुठल्याही प्रतिस्पर्धी पक्षात गेल्यास त्यामुळे काँग्रेसला नुकसान होऊ शकते. पंजाबचा मुख्यमंत्री बनण्याची सिद्धूची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. सिद्धूंमुळेच पंजाबमध्ये हा विवाद झाला होता. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.