नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. यानंतर भाजप नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केले. परंतु, शेतकरी आंदोलन यापुढेही सुरूच राहील. लगेच ते मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मांडली. तर, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका विरोधकांनी केली. यानंतर भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांनी ट्विटर करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले.
केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी यासाठी ‘गुरुपूरब’ हा खास दिवस निवडला. त्याच्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, हेही यातून दिसून येते. त्यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, असे ट्विट अमित शाह यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांबद्दल मोदींची संवेदनशीलता व वचनबद्धता : गडकरी
केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा देशाचे अन्नदाते, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची असलेली संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते, असे ट्विट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी करत या निर्णयाला पाठिंबा दर्शवला
भाजप सर्वांच्या मतांचा आदर करतो : आदित्यनाथ
पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी नाईलाजाने निर्णय घेतला : चंद्रकांत पाटील
शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात असल्याचं पाटील म्हणाले.