Top Newsराजकारण

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

गोव्यात जनमताची चोरी होऊ देणार नाही; पवार पंतप्रधान कधी होतील अन् मुख्यमंत्री घराबाहेर केव्हा पडतील?

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असून, शरद पवार स्वतः उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर निवडणुका लढवणार आहे. तर, गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, आता गोव्यात जनमताची चोरी होऊ देणार नसल्याचं प्रत्युत्तर पवारांना दिलं आहे.

गोव्यात महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. गोव्यातील भाजप सरकार हटवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पाच पैकी तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यासंदर्भात विधान केले. विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही, त्यामुळे भाजपच्या जागा कमी होतील हाच त्यांचा आनंद आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा जरूर प्रयोग करावा, पण गोव्यात आम्ही त्यांना संधीच देणार नाहीत. स्पष्ट बहुमत गोव्यातील जनता भाजपला देईल. महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी झाली, ती चोरी गोव्यात आम्ही होऊ देणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

शरद पवार पंतप्रधान कधी होतील अन् मुख्यमंत्री घराबाहेर केव्हा पडतील?

उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी, समाजवादी आणि इतर पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून येथे परिवर्तन होणार, असे भाकित शरद पवारांनी केले. पवारांच्या या भाकितावरुन चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे शिवसेनेचे खा. संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे, अशा शब्दात पाटील यांनी दोन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली.

या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी…, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button