Top Newsराजकारण

सिब्बल यांच्या पाठोपाठ गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा नेतृत्वावर नाराज

काँग्रेसमध्ये घमासान; सोनिया गांधीना पत्र लिहून केली महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यपदी नियुक्ती केलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. एकीकडे निवडणुका उंबरठ्यावर असताना दुसरीकडे काँग्रेसमधील कलह पक्षासाठी चिंता वाढवणार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, यात एक महत्त्वाची मागणी केली आहे. यासह आझाद यांनी कपिल सिब्बल यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या विधानामुळे युवक काँग्रेस नाराजी झाली असून त्यांनी सिब्बल यांच्या घरासमोर निषेध व्यक्त केला. या घटनेवरुन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेतल्याने नवा अध्यक्ष नेमावा का, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असतानाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काँग्रेस नेते हबकून गेले आहेत. ते भाजपला मदतच करतील, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कपिल सिब्बल यांनी दिल्लीत माध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी करत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षच नसताना निर्णय कोण घेतो, अशी विचारणा केली. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, त्यांनीही काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते त्या २३ नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या नेत्यांच्या गटाला जी-२३ असेही संबोधले जाते.

काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्णायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पक्षाचे आणखी एक नेते मनीष तिवारी यांनीही अशाच आशयाचे विधान केले होते. अमरिंदर यांचा राजीनामा घेताना, नवा मुख्यमंत्री ठरवताना पक्षात चर्चा झाली नाही, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जणांनी पदे सोडली, पण पक्ष गप्पच आहे. अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची लगेच बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंदिया, जितीन प्रसाद, सुष्मिता देव, केरळचे व्ही. एम. सुधीरन यांनी पक्ष सोडूनही श्रेष्ठींना जाग आली नाही, अशी टीकाही सिब्बल यांनी केली असून, राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर ते पद त्यांना दिल्यास मुख्यमंत्री अशोक गेहलोत व त्यांचे समर्थक बंड करतील, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी काँग्रेसची पार कोंडी झाली आहे, असेही ते म्हणाले.

आनंद शर्मा संतप्त

सिब्बल यांच्या विधानामुळे युवक काँग्रेस नाराजी झाली असून त्यांनी सिब्बल यांच्या घरासमोर निषेध व्यक्त केला. या घटनेवरुन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आनंद शर्मा यांनी ट्विट करत कपिल सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच, सिब्बल यांच्या घराबाहेर सुरू असलेली गुंडागर्दी आणि हल्ल्याचे वृत्त त्रासदायकआहे. याप्रकारची कृती पक्षाला बदनाम करते आणि निषेधार्ह आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारा काँग्रेस पक्ष आहे. विभिन्न विचार हेच राजकीय लोकशाहीची निशाणी आहे. असहिष्णुता आणि हिंसा हे काँग्रेसच्या विचाराविरुद्ध आहे. त्यामुळेच, वरील घटनेला जे जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध पक्षाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही आनंद शर्मा यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी सोनिया गांधींना उद्देशून ट्विट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button