पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज गहाळ
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआरसुद्धा गायब झाल्याची माहिती आहे. ही माहिती पोलीस दलातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. नुकताच या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आता या प्रकरणाशी निगडीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाल्याचे माहिती पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूनंतर हा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाला आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआरसुद्धा ( Digital Video Recorder) गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. हिरेन यांचा मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवला. त्यानंतर या प्रकरणातील सर्व धागेदोरे जमवण्याचे काम एटीएसने केले. आपल्या तपासानंतर हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे रहस्य उलगडल्याचा दावा एटीएसने काही दिवसांपूर्वी केला. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. सध्या हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी एनएयए करत आहे. या पार्श्वभूमीवर आता नवी माहिती समोर येत आहे.
डीव्हीआर म्हणजेच डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर होय. या यंत्रणेशी अनेक कॅमेरे जोडता येतात. तसेच डिव्हीआरमुळे सुसूत्रता बाळगता येतात. डीव्हीआर हे एक हार्डडिस्क असून त्याच्यामार्फत एकाच वेळी अनेक कॅमेऱ्यांमधून व्हिडीओ रेकॉर्डिंग सेव्ह करता येऊ शकते. डीव्हीआरच्या माध्यमातून अनेक सीसीटीव्हींचे फुटेज कॉम्प्यूटर नेटवर्कवर पाठवता येऊ शकतात. डीव्हीआरच्या माध्यमातून कोणताही डेटा पॉज किंवा जलद गदतीने पाहता येतो.