वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
मुंबई : वानखेडेप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात खेद व्यक्त केलाय. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. याविषयीचं हमीपत्र त्यांनी हायकोर्टात सादर केलंय. तसंच यानंतर वानखेडे यांच्याविषयी कोणतंही व्यक्तिगत विधान करणार नाही, असं म्हटलंय.
त्यांनी ४ पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलंय. ज्येष्ठ वकील ऍस्पी चिनॉय यांच्यामार्फत हायकोर्टात म्हणणं मांडलं. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्यं केली. कोणाविषयी वैयक्तिक मत व्यक्त केलं नाही. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. बिनशर्त माफी मागतो. यापुढे अशी विधानं करणार नाही, याची हमी देतो, असं प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केलंय. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असा आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यावर शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठानं याविषयी विचारणा केल्यानंतर मलिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं.