नवी दिल्ली : कोरोना महामारीशी संपूर्ण जग लढत आहे. रोज अनेकांचे मृत्यू होत आहे. जागतिक आरोग्य संघटना (‘डब्ल्यूएचओ’) नेहमीच जगाला कोरोना विषयी नवीन माहिती आणि सल्ले देत असते. यावेळी मात्र ‘डब्ल्यूएचओ’ने एक धक्कादायक घुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांना हादरा बसू शकतो. ‘डब्ल्यूएचओ’च्या म्हणण्यानुसार, जगात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा खोटा आकडा समोर आणला गेला आहे. वास्तविक कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा खूप जास्त आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत जगभरात जवळपास ३० लाख लोकांनी आपला जीव गमावला. मात्र हा मृत्यूचा आकडा अधिकृत आकड्यांच्या दुप्पट असल्याचा खुलासा ‘डब्ल्यूएचओ’ने केला आहे.
‘डब्ल्यूएचओ’ने त्यांच्या जागतिक आरोग्य अहवालात असे म्हटले आहे की, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जगभरात ८ कोटी २० लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होते. त्यापैकी १८ लाखांहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात हा आकडा फार जास्त होता. जगभरात याहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगासमोर मृत्यूचा खोटा आकडा आणण्यात आला. ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी असे म्हटले आहे की, जोपर्यंत जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम पार पडत नाही तोवर मृत्यूंची संख्या वाढत राहील. त्यामुळे सर्व देशांना लवकरात लवकर लस घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२० मध्ये ३० लाख लोकांच्या मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रत्यक्षात या अधिकृत आकड्यांच्या तब्बल १२ लाखांनी मृत्यूंची संख्या अधिक आहे. २०२० मध्ये जगातील मृतांचा आकडा अत्यंत कमी दाखवण्यात आला आहे.